Ad will apear here
Next
योगमूर्ती श्री जनार्दनस्वामी
योगप्रसार आणि योगोपचार या महान कार्यांतील एक अग्रणी


गेल्या शतकात ज्यांनी योगप्रसारासाठी प्रचंड काम केले, त्यांमधील एक अग्रणी नाव म्हणजे योगमूर्ती श्री जनार्दनस्वामी. कोकणात जन्मलेल्या आणि नागपूर ही कर्मभूमी असलेल्या जनार्दनस्वामींनी १९५१मध्ये योगाभ्यासी मंडळाची स्थापना केली. कोणतेही शुल्क न घेता योगप्रशिक्षण देणे, हे या संस्थेचे उद्दिष्ट असून, आजतागायत ते व्रत अखंड चालू आहे. ‘किमया’ सदरात ज्येष्ठ लेखक रवींद्र गुर्जर आज लिहीत आहेत जनार्दनस्वामींबद्दल...
...........
पृथ्वीतलावर, केवळ भारतातच नव्हे तर जगभर, शतकानुशतके वेळोवेळी महापुरुष जन्माला येत असतात. त्यांच्याद्वारा काही विशिष्ट अशी लोकोत्तर कार्ये घडतात. लोकांचे आणि ओघानेच जगाचे कल्याण करणे, हेच त्यांचे ध्येय असते. प्राचीन काळापासून भारताला फार मोठी ऋषिपरंपरा लाभली आहे. त्यांनी तत्त्वज्ञान, विज्ञान, आयुर्वेद, संगीत, गणित, व्याकरण इत्यादी क्षेत्रांत श्रेष्ठ दर्जाचे काम करून ठेवले आहे. भारताने जगाला दिलेली आणखी एक मोठी देणगी म्हणजे ‘योग’... अर्थात योगासने आणि योगोपचार. 

योगाचा प्रचार आणि प्रसार हजारो वर्षे चालत आलेला आहे. गेल्या शतकात ज्यांनी योगप्रसारासाठी प्रचंड काम केले, त्या व्यक्ती आणि संस्था म्हणजे मुंघेर (बिहार) येथील ‘बिहार स्कूल ऑफ योग’ (स्थापना : १९६३, संस्थापक : स्वामी शिवानंद आणि सत्यानंद सरस्वती), पुण्याचे योगमहर्षी बी. के. एस. अय्यंगार, हृषिकेशचे रामदेवबाबा, लोणावळ्याचे कैवल्यधाम आणि शेकडो थोर पुरुष. त्याच यादीत एक नाव विशेषत्वाने घालावे लागेल, ते म्हणजे योगमूर्ती श्री जनार्दनस्वामी. त्यांचा जन्म कोकणात झाला. परंतु नागपूर ही कर्मभूमी ठरली. 

योगाचा प्रसार आणि योगप्रचार हेच आपले मुख्य ध्येय ठरवून स्वामीजींनी १९५१मध्ये योगाभ्यासी मंडळाची स्थापना केली. कोणतेही शुल्क न घेता योगप्रशिक्षण देणे, हे या संस्थेचे उद्दिष्ट असून, आजतागायत ते व्रत अखंड चालू आहे. हजारो जण त्याचा लाभ घेत आलेले आहेत. 

समाधानाय सौख्याय नीरोगत्वाय जीवने।
योगमेवाभ्यसेतु प्राज्ञ: यथाशक्ति निरंतरम्॥
हा स्वामीजींचा संदेश मंडळाने अंगीकारला आहे. 

(निरोगी जीवन, समाधान आणि सौख्य यांच्या प्राप्तीसाठी शहाण्या माणसाने आपल्या शक्तीनुसार निरंतर योगाचा अभ्यास (साधना) करावा.)

पूर्वीच्या रत्नागिरी आणि सध्याच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कवठे गावात स्वामीजींचा जन्म १८ नोव्हेंबर १८९२ रोजी झाला. त्यांचे नाव जनार्दन वामन गोडसे. त्यांच्या कुटुंबात आई, वडील, तीन मुले आणि तीन मुली. जनार्दन हा दुसरा मुलगा. बाकी भावंडांची लग्ने झाली. परंतु जनार्दन अविवाहित राहिला. जनकल्याणाचे महान कार्य त्याच्या हातून घडावयाचे होते. अत्यावश्यक प्राथमिक शिक्षण घरातच घेऊन, जवळच्या गावातील वेदपाठशाळेत त्याने अभ्यास सुरू केला. पुढे कसबा-संगमेश्ववर आणि आंजर्ले या गावांमधील पाठशाळांतून वेदाध्ययन पूर्ण केले. नंतर कोळप या गावी आचार्य नित्सुरे गुरुजींकडे वेदांचे मर्म समजावून घेतले. तीव्र स्मरणशक्ती आणि उपजत प्रखर बुद्धिमत्तेच्या आधारे वेदपठणाच्या अष्टविकृती (प्रकार) त्यांनी आत्मसात केल्या. 

त्यानंतर सांगलीच्या श्रीमंत पटवर्धन पाठशाळेत ऋग्वेद, कृष्ण यजुर्वेद, व्याकरण, न्याय आणि ज्योतिष या पाच विषयांचे अध्ययन त्यांनी पुढे चालू ठेवले. त्यातून आधी झालेला अभ्यास अधिक पक्का झाला. जोडीला पळणे, पोहणे, सूर्यनमस्कार हे व्यायाम करणेही बंधनकारक होते. जनार्दन आता तात्या या नावाने ओळखले जात होते. सन १९१४ ते १८ (वय २२ ते २६) या काळात त्यांनी दशग्रंथ, जटा-घनपाठ, सामवेद यांचे पदव्युत्तर शिक्षण घेतले. पुण्यातील वेदशास्त्रोत्तेजक सभेच्या दोन परीक्षाही त्यांनी दिल्या. अशा रीतीने, शाळा-महाविद्यालयात जसे विद्यार्थी शिक्षण घेतात, त्याप्रमाणे जनार्दनशास्त्रींनी १५ वर्षे वेदाध्ययन करून ते वेदशास्त्रसंपन्न झाले. 

दर वर्षी दोन महिने घरी येऊन ते आई-वडिलांना कामात मदत करत. पौरोहित्य, धार्मिक कृत्ये करून सर्व दक्षिणा घरात देत. ज्ञान आणि आरोग्यसंपन्न झाल्यामुळे ते तेजस्वी दिसत. आता दाढीही वाढलेली होती. त्या वेळी ‘दाढीवाले गोडसेबुवा’ म्हणून ते ओळखले जात. 

त्यांचा आहार आश्चर्य वाटेल असा भरभक्कम होता; परंतु व्रतांच्या काळात ते नुसता कडुनिंबाचा रस आणि पाण्यावर राहू शकत. किती विलक्षण इंद्रियनिग्रह! वैराग्यसंपन्न बुवांनी लग्न न करण्याचा निश्चियच केला होता. १९२० ते २२मध्ये ते त्र्यंबकेश्वारच्या वेदशाळेत गुरुजी म्हणून राहिले. आई-वडिलांना त्रिस्थळी आणि गोकर्ण महाबळेश्वशरची यात्रा घडवली. १९२५ साली त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर तात्यांनी २००० मैलांचा पायी प्रवास करून गंगोत्रीला वडिलांच्या अस्थींचे विसर्जन केले. रोजचे त्रिकाळ स्नान, आन्हिक यात कधीही खंड पडला नाही. माधुकरी मागून रोज एकदा ते भोजन करीत. विशेष म्हणजे, वाटेत त्यांचे पैशांवाचून काहीही अडले नाही. या यात्रेत त्यांनी खूप प्रकारचे अनुभव घेतले. पुढील आयुष्यात त्यांचा खूपच उपयोग झाला. 

एकदा द्वारकेहून परत येताना श्रीक्षेत्र सिद्धपूरगावी शिवमंदिरात मुक्काम करून, पुढील एका वर्षात दर दोन दिवसाला एक याप्रमाणे ऋग्वेदाची १०८ पारायणे केली. त्यानंतर अष्टादश पुराणांचे वाचन सुरू केले. त्यांच्यासारखे कठोर परिश्रम, अध्ययन आणि साधना करणाऱ्या व्यक्ती जगात किती दुर्मीळ असतील!

सिद्धपूरच्या मंदिरात एकदा एक संन्यासी मुक्कामाला आले. जनार्दनशास्त्रींची उपासना बघून ते अत्यंत प्रसन्न झाले. आपल्याला अवगत असलेले योगाविद्यारहस्य (ज्ञान) स्वीकारण्यासाठी सुपात्र सच्छिष्य मिळाला, याचा त्यांना आनंद झाला. त्या संन्यासी महात्म्याने जनार्दनस्वामींना योगशास्त्र शिकवण्यास सुरुवात केली. चातुर्मास चालू होता. अवघ्या चार महिन्यांत शिष्याने गुरूकडून संपूर्ण योगविद्या आत्मसात केली. स्वामींच्या जीवनाला पुढे फार मोठी कलाटणी मिळणार होती. ते संन्यासी त्यानंतर लगेच गायब झाले, ते पुन्हा कधीच दिसले नाहीत. (ते साक्षात पतंजली मुनी होते की काय!) त्या गुरू-शिष्यांना एकमेकांचे नावदेखील ठाऊक नव्हते. असे कुठे असते का हो! त्यांच्या योगविद्येचा लाभ पुढे लाखो लोकांनी घेतला. यज्ञयागादि धार्मिक विधींनाही त्यांची उपस्थिती असे. त्यांना अनेक दिव्यशक्ती प्राप्त झाल्या असणार. परंतु त्यांनी लोकांना त्यांची जरादेखील जाणीव होऊ दिली नाही. ते स्वत: ‘महाराज’ बनले नाहीत किंवा लोकांकडून त्यांनी आरतीही ओवाळून घेतली नाही. 

नर्मदा परिक्रमा हा पुढचा कार्यक्रम ठरला. एका शास्त्रोक्त परिक्रमेसाठी सुमारे साडेतीन वर्षे लागतात. चातुर्मासात एकाच ठिकाणी मुक्काम करावा लागतो. अशी एकच नव्हे, तर त्यांच्या दोन परिक्रमा झाल्या. आता संन्यास घ्यावा, असे त्यांना प्रकर्षाने वाटू लागले. वैराग्य तर धगधगीत होतेच! संकेताप्रमाणे आईची संमती घेऊन ते थेट काशीला गेले आणि तिथे विधीनुसार संन्यास घेतला. तात्यांचे जनार्दनस्वामी झाले. प्रसिद्धीपराङ्मुख असल्यामुळे जवळचे लोक सोडून बाहेर कोणालाही त्यांच्या ‘असामान्यत्वा’ची ओळख नव्हती. साधे नाव-गावसुद्धा नाही! नागपूरचे प्रज्ञाभारती डॉ. श्री. भा. वर्णेकर यांनी स्वामीजींचे ‘योगमूर्ती’ हे चरित्र लिहिले, तेव्हाच जगाला त्यांची ‘खरी ओळख’ झाली. संन्यासी असूनही ते सर्व लोकांच्यात सहजपणे मिसळत आणि असेल त्या परिस्थितीनुसार खाणे-पिणे-राहणे स्वीकारत. 

स्वामीजी अनेक विषयांत पारंगत असले, तरी ‘जगाच्या कल्याणा’ योगप्रसार हेच त्यांनी आपले ध्येय ठरवले. आजूबाजूला सर्वत्र शारीरिक आणि मानसिक विकारांनी त्रस्त असलेले लोक दिसतात. योगाद्वारे त्यावर मात करून, निरोगी जीवन प्राप्त होते. स्वामीजींना तर योगाचे श्रेष्ठ असे ज्ञान (दैवी योजनेने) मिळालेले होते. संयम, मनाची एकाग्रता, विवेक आणि विषयोपभोग ताब्यात ठेवण्यासाठी प्राणायाम, तसेच योगासने अत्यंत उपयुक्त ठरतात, हे भारतीयांना हजारो वर्षे ज्ञात आहे. तज्ज्ञ व्यक्तीकडून त्याचे मार्गदर्शन मिळणे मात्र अत्यावश्यक आहे. चुकीच्या पद्धतीने आसने किंवा प्राणायाम केला, तर त्याचे विपरीत परिणाम होऊ शकतात. योग्य प्रकारे ते केल्यास आश्चचर्यकारक उपयोग दिसून येतो. दीर्घकाळचे रोग आणि सध्या प्राबल्य असलेले मधुमेह, रक्तदाब इतकेच नव्हे, तर हृदयविकारही आटोक्यात राहू शकतो. काही त्रास/रोग तर पूर्णपणे बरे होतात. 

योगाचे शिक्षण घेतल्यानंतर स्वामीजी जिथे कुठे मुक्काम असेल तिथे योगासनांचे महत्त्व सांगून, स्वत: आसनेसुद्धा करून दाखवत. संन्यासाश्रम स्वीकारल्यानंतर होशंगाबाद येथे एका दत्त मंदिरात तीन वर्षे राहून त्यांनी योगप्रसार केला. नंतर बंगाल, बिहार, मध्य प्रदेश, ओडिशा, इत्यादी राज्यांमध्ये फिरताना त्यांनी ते कार्य चालू ठेवले. प्रत्येकाच्या व्याधी विचारून त्यानुसार आसने शिकवणे, हे काम अवघड होते. त्यातून अपेक्षा तर काहीच नव्हती. हळूहळू लोकांचे सहकार्य मिळत गेले. लोकांना चांगला गुण येत होता, दु:ख-वेदना कमी होत होत्या. जोडीला स्वामीजींकडून तत्त्वज्ञान आणि बोधपर कथाही ऐकायला मिळत होत्या. 

सन १९४८मध्ये ते अमरावतीला आले. तिथल्या लोकांना स्वामीजींचे ज्ञान, कार्य आणि व्रतस्थ जीवनाची पुरेपूर कल्पना आली. एकवीरा देवीच्या मंदिरात राहण्यासाठी जागा मिळाली. तिथेच लहान-थोर लोकांना आसनांचे प्रशिक्षण सुरू झाले. रात्री ‘योगसाधने’वर त्यांची प्रवचने होत. अन्यत्रही वर्ग सुरू झाले. अमरावतीत दोन वर्षे हे कार्य अविरत सुरू राहिले. स्वामीजींनी १९५०मध्ये तिथेच एक योगसंमेलन भरवले. त्याच संमेलनात भारतीय योगभ्यासी मंडळाची स्थापना झाली. एक प्रकारे योगाभ्यासाचा सुवर्णकाळ सुरू झाला. शिक्षक आणि विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रम तयार करण्यात आले. त्याला आवश्यक अशी पुस्तके स्वामीजी तयार करू लागले. शिस्त आणि ठरलेल्या वेळेचे पालन यावर त्यांचा कटाक्ष असे. त्यांचे वागणे-बोलणे सहज, सुलभ असायचे. यज्ञयागादि कार्यक्रमांना उपस्थिती सुरूच होती. 

नंतर स्वामीजी नागपूरला आले. उद्देश हाच, की तिथे दुसरे योगसंमेलन भरवावे, आणि उत्साही लोकांचा परिचय व्हावा. त्यांनी १९५१मध्ये स्थानिक लोकांच्या मदतीने योगाभ्यासी मंडळाची स्थापना केली. सहा आणि सात नोव्हेंबर १९५१ रोजी तिथे दुसरे भारतीय योगसंमेलन भरवले. आता नागपूर हीच त्यांची कर्मभूमी झाली. डॉ. श्री. भा. वर्णेकर ‘राष्ट्रभक्ती’ या साप्ताहिकाचे संपादक होते. त्या नियतकालिकातून स्वामीजींचे योगविषयक मौलिक लेख प्रसिद्ध होऊ लागले. डॉ. वर्णेकर त्यांचे परम शिष्य बनले. असा अधिकारी शिष्यपरिवार वाढतच गेला. संपूर्ण विदर्भात ठिकठिकाणी योगाचे वर्ग सुरू झाले त्यांची संख्या हजारोंच्या घरात गेली. योगोपचार केंद्रेही सुरू झाली. 

डिसेंबर १९६६ मध्ये स्वामीजींचा अमृतमहोत्सव साजरा झाला. डॉ. वर्णेकरांच्या संपादकत्वाखाली १९६७पासून योग या विषयाला वाहिलेले ‘योगप्रकाश’ हे पहिले मराठी मासिक सुरू झाले. ते दिवाळी अंकांसह गेली ५२ वर्षे नियमितपणे प्रसिद्ध होते. 

२९ मार्च १९६८ रोजी ‘मंडळ’ स्वत:च्या जागेत आले. ती वास्तू, योग-मंदिर आणि आपली सर्व पुस्तके स्वामीजींनी जनतेच्या (नागपूरकरांच्या) स्वाधीन केली. देशातील योगविद्येचे एक आदर्श केंद्र तिथे निर्माण झाले. १९७२मध्ये ‘योगसंशोधन केंद्र’ सुरू झाले. ‘रामनगर’ भागात दोन सुंदर वास्तू निर्माण झाल्या. हजारो प्रशिक्षित योगशिक्षक आणि त्या प्रमाणात नियमित योगासने करणारा मोठा वर्ग तयार झाला. आजही योगाभ्यासी मंडळाच्या सभागृहात रोज ७००-८०० जण आसने आणि उपचारांसाठी हजर असतात. स्वामीजींच्या पुस्तकांच्या असंख्य आवृत्त्या निघत आहेत. इतर भाषांमध्येही त्यांचे अनुवाद झाले आहेत. 

२४ ऑगस्ट १९७६ रोजी स्वामीजींच्या मेंदूत रक्तस्राव सुरू झाला. मेडिकल कॉलेजमध्ये त्यांच्यावर यशस्वी उपचार होऊन ते आठ ऑक्टोबरला योगमंदिरात परत आले. २२ मार्च १९७८ रोजी चंद्रपूरच्या योगसंमेलनालाही ते हजर राहिले. २५ मे १९७८ रोजी त्यांना पक्षाघाताचा सौम्य झटका आला आणि दोन जून १९७८ रोजी रात्री आठ वाजता ते परमात्म्याशी एकरूप झाले. योगमंदिराच्या दक्षिणेला असलेल्या १० बाय १० बाय १० फूट जागेत तीन जून रोजी स्वामीजी ‘समाधिस्थ’ झाले. त्यांनी आपल्या ८६ वर्षांच्या जीवनात ‘योगमहायज्ञ’ अखंड धगधगता ठेवला आणि प्रसादरूपाने लाखो स्त्रीपुरुषांना निरोगी आयुष्याचे ‘पायसदान’ दिले. 

गेली ६८ वर्षे योगाभ्यासी मंडळाचे कार्य नियमित, नि:शुल्कपणे सुरू आहे. योगवर्ग सकाळी सहाला सुरू होतात. स्त्री-पुरुषांसाठी स्वतंत्र वर्ग चालतात. प्रशिक्षण घेतल्यावर सकाळी सहा ते साडेसात या वेळेत सरावासाठी स्वाध्याय वर्ग घेतला जातो. रोज सकाळ-संध्याकाळ व्याधिग्रस्तांना यौगिक उपचारांचे मार्गदर्शन केले जाते. त्याशिवाय दोन प्रमाणपत्र परीक्षा घेण्यात येतात. वेळोवेळी स्वतंत्र शिबिरे आयोजित केली जातात. मंडळात कोणीही पगारी सेवक नाही. सर्व कार्य सेवावृत्तीने चालते. नागपुरात सुमारे ८० ठिकाणी नि:शुल्क योगवर्ग चालतात. २८० योगशिक्षक आहेत. संस्थेची अपेक्षा एकच आहे - लोकांनी नियमितपणे योगासने करावीत, निरोगी राहावे आणि ‘गुरुदक्षिणा’ म्हणून प्रत्येकाने पाच जणांना योगासने शिकवावीत. 

पू. जनार्दनस्वामींच्या भव्य पादुका भवनाचे सात-आठ मार्च २०१९ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्या वेळी नितीन गडकरी, चंद्रशेखर बावनकुळे आदी मान्यवर उपस्थित होते. स्वामीजींच्या जन्मस्थानी, कवठे येथे त्यांचे एक ‘स्मृतिमंदिर’ व्हावे, असा मंडळाचा संकल्प आहे. 

नागपूरला कधी गेलात, तर तिथल्या रामनगरमधील योगाभ्यासी मंडळाला अवश्य भेट द्या. तिथल्या स्वामीजींच्या मूर्तीचे तेजस्वी डोळे सर्वांना कृपाशीर्वाद देत असतात!

योगाभ्यासी मंडळाची वेबसाइट : https://jsyog.org/

संपर्क : ९८२३३ २३३७०
ई-मेल : rvgurjar@gmail.com

रवींद्र गुर्जर(‘बाइट्स ऑफ इंडिया’वर दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या रवींद्र गुर्जर यांच्या ‘किमया’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/TiSWnh या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध आहेत.)

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/GZZQCE
 माहिती अप्रतिम अशीच!फक्त दोन गोष्टी लिहितो,कारण मी कोकणांतलाच आहे.एकतर त्यांचे गांव कवठी असून ते कुडाळ तालुक्यात आहे व दुसरं म्हणजे त्यांचे आडनांव फडके आहे.कवठीला त्यांचे घर आजही आहे.कवठीत गोडसे कुणीच नाहीत.आपण याची खातरजमा करावी.1
 I am follower of swami, but not aware of mahima of swami. Very useful information.
Similar Posts
रसिकांच्या हृदयातील ध्रुवतारा - मोहम्मद रफी रसिकांच्या हृदयातील ध्रुवतारा असं ज्यांचं वर्णन करता येईल, त्या मोहम्मद रफी यांचा २४ डिसेंबर हा जन्मदिन. त्या निमित्ताने, ज्येष्ठ लेखक रवींद्र गुर्जर त्यांच्या ‘किमया’ या सदरात आज लिहीत आहेत मोहम्मद रफी यांच्याबद्दल...
स्वामी चक्रजित : वेदप्रणित योगासने आणि योगोपचार यांचे प्रवर्तक स्वामी चक्रजित यांनी योगसाधनेतील सर्व उच्च स्थिती प्राप्त केल्या होत्या. योगाचा प्रसार हे त्यांच्या आयुष्याचं एक ध्येय होतं. अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी योगाच्या प्रशिक्षणाने उच्च पदावर आरूढ केलं. त्यांचा समाधीचा प्रयोग पुण्यात झाला होता. तो घडवून आणण्याच्या प्रक्रियेत ज्येष्ठ लेखक रवींद्र गुर्जर सहभागी होते
‘माझे जीवनगाणे’ ज्येष्ठ अनुवादक, लेखक रवींद्र वसंत गुर्जर यांनी आज (२९ एप्रिल २०१८) ७३व्या वर्षात पदार्पण केले. त्या निमित्ताने त्यांच्या ‘किमया’ सदरात त्यांनी स्वतःच्या जीवनप्रवासाचा घेतलेला हा आढावा...
पावसचे आदर्श कर्मयोगी भाऊराव देसाई आंबेवाले पावसचे देसाई बंधू आंबेवाले आज जगप्रसिद्ध आहेत. त्यांच्या उद्योगाचा पाया ज्यांनी घातला, ते पावसचे भाऊराव देसाई म्हणजे आदर्श कर्मयोगी. भाऊंचे संपूर्ण जीवन स्वामी स्वरूपांनंदांच्या चरणी लीन होते आणि त्यांच्या त्यागमय सेवाकार्यामुळे पावस हे कोकणातले प्रति पंढरपूर बनले. भाऊराव देसाई आणि त्यांच्या कुटुंबाशी

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language